पोस्टल कॉलनीसह सीसीटीव्ही पालकर शाळा, कृष्णा पॅलेस हॉटेल, श्री हॉस्पिटल, डीवायएसपी कार्यालयाचा गौरव
कराड : कराडन गरपालिकेतर्फे घेतलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण लीग २०२० च्या दुसऱ्या सत्रातील मानांकनाचे वितरण सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते झाले. प्राथमिक शाळांमध्ये का. ना. पालकर शाळा, माध्यमिक शाळांत सरस्वती विद्यामंदिर, स्वच्छ हॉटेलमध्ये कृष्णा पॅलेस, हॉस्पिटलमध्ये श्री हॉस्पिटल, स्वच्छ प्रशासकीय कार्यालयांत पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, यशवंत आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंत पवार, नगरसेवक सुहास जगताप, बाळासाहेब यादव, शारदा जाधव, स्मिता हलवान, विद्या पावसकर, अंजली कुंभार, मुख्याधिकारी यशवंत डांगे, प्रा. जालिंदर काशीद आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छ शाळा, हॉटेल, हाऊसिंग सोसायटी, मार्केट, शासकीय कार्यालये व स्वच्छ हॉस्पिटलना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणारे आणि शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांचाही गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.राजमाने म्हणाले, कै. पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टीतून कराडचा विकास झाला. स्वच्छ भारत स्पर्धेसाठी पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक झोकून देवून काम करत आहेत. या सर्वांच्या सहकार्यानेच नगरपालिकेला यश संपादन झाले आहे. नागरिकांनी स्वच्छ भारत सर्वेक्षणाकडे स्पर्धा न पाहता स्वच्छता ही सवय अंगीकारुन कायमस्वरुपी काम सुरु राहावे. यातून राज्य, देशपातळीवर शहराचा नावलौकिक कायम राहिल. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :-(अनुक्रमे गट व प्रथम तीन क्रमांक) : स्वच्छ प्राथमिक शाळा गट-का. ना. पालकर शाळा, पालिका शाळा क्रमांक तीन, नऊ. माध्यमिक शाळा गट-सरस्वती विद्यामंदिर, विठामाता विद्यालय, केशवराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल. स्वच्छ हॉटेल-कृष्णा पॅलेस हॉटेल, अलंकार हॉटेल, कोयना रेस्टॅरेंट. स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धा- श्री हॉस्पिटल, सिद्धविनायक हॉस्पिटल, चैतन्य बालरुग्णालय. स्वच्छ हाऊसिंग सोसायटी- शिवाजी हाऊसिंग सोसायटी, प्रकाशनगर, स्वराज्य हाऊसिंग सोसायटी. स्वच्छ प्रशासकीय कार्यालय-उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय. स्वच्छ मार्केट-शिवाजी क्लॉथ मार्केट.