स्वतःचे, समाजाचे भक्षक होऊ नका !

#reporters diary


स्वतःचे, समाजाचे भक्षक होऊ नका !


हे मी लिहणार नव्हते, कारण एकदा तुम्ही रिपोर्टिंग स्विकारलं की हे करावचं लागतं. बाहेर वाट्टेल ते होवो, बातम्यांचे, माहिती देण्याचं काम अटळ असतं. सगळे सोर्स उकरून काढायचं, सगळं कौशल्य पणाला लावायचं, संधी मिळेल तिथे घुसायचं, माहिती काढायची..हा भाग अटळ असतो. यापूर्वी तणावाच्या परिस्थितीमध्ये हे  अनेकदा केलं, माझ्यासारखे माझे शेकडो सहकारी हे करतायत, उत्तमपणे करतायत..मला त्यांचा अभिमान आणि कृतज्ञ जाणीव आहे....


कस्तुरबा, इतर सार्वजनिक रुगणालय, ट्रेनचा प्रवास ही सगळी संसर्संगाची ठिकाणं आहे. तिथे काही वेळ द्यावा लागतो.. हे सगळं समाजापर्यंत जायला हवं यासाठी आम्हा पत्रकारांची ही धडपड सुरु आहे...आज संध्याकाळी टाळ्यांचा कडकडाट करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले लोक  आणि मुंबईच्या अनेक ठिकाणचे जल्लोषी फोटो पाहिल्यानंतर मन विषण्ण झालं, उदासीने भरून आलं. संताप होतोय. लहान मुलं, महिला कशासाठी नाचतायत..कोव्हीड १९ शरिरात कसा कुठून शिरकाव करेल याची कल्पना तरी आहे का..अर्धी लाकडं मसणात गेलेले नाचतायत नाचा, पोरांबाळांना तरी अडवा यार.


मी लेचीपेची  घाबरट नाही. तरीही मागील अनेक दिवस कोव्हीड बद्दल इतकं बोलतेय आणि लिहतेय की झोपेतही हा विषाणू पाठ सोडत नाही. दचकून जाग येते.झोप लागत नाही.  ही भिती नाहीय, पण सतत काही चुकणार नाही ना, माहिती राहणार नाही ना, याचं एक अदृश्य टेन्शन..


ज्या डॉक्टरांशी, मंत्र्याशी बोलते त्यांनी  ऑन दि रेक़ॉर्ड आणि ऑफ दि रेकॉर्ड अशी दोन्ही माहिती दिलीय. त्यातली जी सांगता येईल त्या आधारे  ही परिस्थिती गंभीर आहे, संवेदनशील आहे.ती शांतपणे आणि धीराने टॅकल करायला हवी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणाऱ्यांना जावे लागणार त्याला इलाज नाही. ज्यांचे पोट हातावर आहे  त्यांचे हाल अटळ आहेत..पण आज टोपे म्हणाले तसे मीच माझा रक्षक व्हायचे आहे..थाळ्या बडवण्याच्या निमित्ताने जी गर्दी पाहिली ती तर स्वतःचाच भक्षक होणारी आहे.


लक्षात घ्या, निपाचा विषाणू शंभरमधील नव्वदजणांचा ठाव घेत होता. करोना मारतो उशिरा पण शरिरात घर करून राहतो. एक संसर्गजन्य माणूस अडीज माणासांना संसर्ग देतो, तो तितक्याच झपाट्याने संसर्गित झाला तर आठवड्याला दोन हजार..कम्युनिटी स्प्रेडच्या तिसरा टप्पा ओलांडायचा नसेल तर स्वतःला घरामध्ये सुरक्षित ठेवा. बाहेर पडू नका, गर्दी करू नका, मला काही होत नाही हा बिनडोक आत्मविश्वास तुमचा खात्मा करू शकतो. ताप, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास संपला गेम..यासाठी लस नाही, औषधे नाहीत. हे सगळं घाबरवण्यासाठी नाही. पण इतक्या यंत्रणा कानीकपाळी ओरडून सांगतातय तरीही स्वतःचं जराही लॉजिक का वापरत नाही. 


अशा प्रकारे जो आजार आज दुसऱ्या टप्प्यात आहे तो तिसऱ्या टप्प्यात जाईल आणि तो जर वाढला तर रुग्णालयामध्ये ओळखीने तरीही कॉट मिळेल की नाही अशी शंका आहे.


कस्तुरबाच्या बाहेरचे रोजचे दृश्य सांगते. अनेक गरीब माणसं साधा खोकला आला तरीही टेस्ट करून घ्यायला येतात. परवा निलाताई नावाची ३५- ४० शी बाई दोन लेकरांना घेऊन आली होती. पोराला इथे कशाला आणल म्हणाले तर नवरा दारुडा आहे मलाही खोकला येतो, मला काही झालं तर पोराचं काय होणार, त्यांना आत्ता कुठे ठेवणार म्हणत तपासणीसाठी आली, दोन तास रांगेत उभी राहिली. तिथे पोलिस बंदोबस्ताला असणारा पोलिसही आजारी पडला आहे..हे सगळे या राज्यातला, या शहरातला एकेक माणसाचा जीव वाचवण्यासाठी झगडत आहे. एकीकडे अशी माणसं तर दुसरीकडे रस्त्यावर नाचणारे बिनडोक मस्तवाल
त्याची जाणीव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवाच पण थोडा सिव्हिक सेन्स पाळा यार..


रुटीन ओपीडी बंद केल्यात, रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण घरी चाललेत. ज्यांच्याकडे माणसं मेलीत त्यांना मृतदेह जाळण्यासाठी संमती घ्यावी लागते..
चीनचे तिसऱ्या आठव़ड्यातल्या  आकड्यांचा ग्राफ वाढत गेला, आपण चौथ्या, पाचव्या आठवड्याकडे जातोय,देशातला पॉझीटीव्ह आकडे तीन आकडी आहे, त्याची मजल दुर्देवाने पुढे गेली तर कठीण आहे. प्लेग महामारी माहित नाही. या आजाराला महामारी लिहायलाही लॅपटॉपवर अजून धीर होत नाही. तसं लिहलं आणि आकडे वाढले तर ही अंधश्नद्धा माझ्रया रॅशनल मनाला धक्का देते..सगळे ठीक राहोत..


पण त्यासंदर्भात या निमित्ताने ज्या ड़ॉक्टरांशी बोलले त्यांनी प्लेगच्या वेळी
झालेले मृत्यू सांगितले ते ऐकून अंगावर काटा आला.
पाणी वाढू लागले की माकडीणीही पोटच्या पोराला पायाखाली घेते, आपण तर माणसाची जमात..परिस्थितीचं गांभीर्य ओळखूनही स्वतःसकट आजूबाजूलाही गाडायला निघालोय..
आम्हा रिपोर्टरचा पहिला सबक असतो कुठल्याही परिस्थितीमध्ये हताश व्हायचं नाही. अंगाला भोक पडत नाही. पोटात जाळ पडतो. थोड सहन करायचं. माहिती काढायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये आशा सोडायची नाही.बातमी पवित्र, समाज अंतिम..
ही परिस्थिती बदलणार. या परिस्थितीमध्ये धीर देणारं लिहायचं, बोलायचं..डोक्यात ते फिट्ट असतं..कारण आम्ही समाजाचे प्रतिनिधी असतो..
ही परिस्थितीही बदलेल..पण त्यासाठी सगळ्यांनी साथ देण्याची गरज आहे.  गर्दी करू नका, अंतर ठेवा स्वच्छतेचे निकष पाळा..हे सतत का सांगितलं जात आहे त्यावर विचार करा..कृती करा..
रिपोर्टर्स डायरीत मी क्वचित हताशा व्यक्त करणारा प्रसंग लिहला..
आजचं मुंबईतल्या अनेक ठिकाणचं दृश्य माणूस म्हणून, पत्रकार म्हणून माझी साफ निराशा करणार होतं. 


पोस्टमार्टम क्षेत्रात जेव्हा एकही महिला नव्हती तेव्हा त्यात करिअर करणाऱ्या माझ्या बंगळूर मधील स्नेही सांगतात सगळेच मृत्यू हे नियतीने अधोरेखित केलेले नसतात,गटाराची झाकणं, मॅनहोल उघडी राहिल्याने, अपघातामध्ये गेलेले काही जीव हे दुर्दम्य चुकीचे फलित असतात. ते टाळता येतात. लहान मुलांचे पीएम कशाला करतेस यावर ती सांगते आक्रोश करणाऱ्या आईबापाचा प्रश्न असतो माझं मुलं कशाने गेलं..कारण हवं असतं कारण त्यांची अस्वस्थता थोडी शांत होते.म्हणूनच ती पत्रकारांनाही सांगते. जीव धोक्यात घालू नका, हे नियतीचे मृत्यू नसतील..


आम्ही साले गटफिलिंग मानतो..नाही होणार काही काळजी घेऊ, परिस्थितीला नडू, भिडू..कुणासासाठी समाजासाठी..
कोणता समाज, रस्त्यावर येऊन बेभान नाचणारा, नऊ महिने गर्भाला जीवापाड सांभाळून रस्त्यावर मरायला सोडणारा अडाण...समाज..


कोणता समाज मला बदलायचा आहे..?